ऐकतेय ना...!
बागेतील मोगरा सुगंधाने मोहरलाय,
दिवस दमून रात्रीच्या मिठीत सुखावतोय,
वाट पाहून दमलेलं वासरू गाईच्या स्तनांना लुचतंय,
सूर्य चंद्राच्या कवेत विसावलाय,
घनगर्द वडावर पक्ष्यांची शाळा भरलीय,
गावाबाहेरील पांधन ऋषिप्रमाने ध्यानस्थ पहुडलिय,
कुंपनाजवळील रातराणी फुलांनी डवरलीय,
वेशिवरील पाणवठा निर्मनुष्य होऊन निपचित पडलाय,
परसबागेतील चाफ्याने मौनराग आळवायला सुरुवात केलीय,
पश्चिमेकडील आकाशाला देवदुतांनी
केशरी, तांबडा रंग देण्याचं काम पूर्णत्वास नेलंय,
घरी परतलेल्या चिमणीने इवलाल्या पिलांच्या चोचीत
खाऊ भरवून पंखांच्या उबेत घेतलंय,
पारावर बसून लहान पोरांचा खेळ पाहणाऱ्या म्हाताऱ्याला
त्याचा भूतकाळ वाकुल्या दाखवतोय,
एक नवविवाहित तरुणी आजीने
पाठविलेल्या संदुकातील गोधडीवरून
मायेने हात फिरवतेय,
अश्या या कातरवेळी...
अगणित कडू गोड आठवनिंच्या थव्यांनी
लाखो प्रियकर, प्रेयसिंच्या मनःपटलावर
मुक्त विहार करायला सुरुवात केलीय.
आणि माहित्येय तुला...!
अश्यातच एका गावाकडील प्रियकराने,
शहरात राहणाऱ्या प्रेयसीला पत्र लिहायला
कागद हाती घेतलाय,
आणि आता
तो कळवणार आहे म्हणे तिला,
त्याच्या गावाकडील अश्याच अगणित गोड
कडू कातरवेळींच्या अविट कहाण्या.
धीरज चौधरी...
18/03/2022
मस्त👍👍
जवाब देंहटाएंअरेरेरे दिलखुश,,,,🍒
जवाब देंहटाएं