गुरुवार, 10 मार्च 2022

प्रवास....

बाहेर पावसाची रीपरीप चालली होती.मि पॅसेंजर च्या डब्यात चढलो व केसावरून हात फिरवून जमा झालेले पावसाचे थेंब अलगद झटकून टाकले व बसन्यासाठी जागा शोधू लागलो . पेरणीचा हंगाम असल्यामुळे व पाऊस असल्यामुळे प्रवाशांची वर्दळ अगदी कमीच होती.रेल्वेचा हॉर्न वाजला व मी आपली जागा पकडली. वातावरण एकदम आल्हाददायी होते . रेल्वेच्या खिडकीमधून आलेली हवेची थंड झुळूक शरीराला स्पर्श करून जात होती. व मनातील आनंद पुन्हा वाढवीत होती .समोरच एक तिशी- पस्तीशितला व्यक्ती आपल्या मुलाला घेऊन बसला होता. मुल मांडीवर डोके ठेवून झोपी गेले होते व मुलाच्या चेहऱ्यावर झोपेतही निरागस असे स्मित पसरले होते. असे वाटत होते की तो देवाशीच संवाद साधतो आहे की काय? की झोपन्यासाठी एक विश्वासाची ,हक्काची व मायाळू जागा मिळाल्यामुळे ते निरागस हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते की काय? असे एक ना अनेक प्रश्नांनी मनाच्या  गाभा-यात गर्दी केली व मन नविनच विचारात गुरफटत गेले.आपले बाळ सुखाने झोपले आहे म्हणून वडीलाच्या चेहऱ्यावररही आनंदाची छटा उमटली होती व त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देत होता. व हे सारे दृष्य मी अगदी डोळ्यात प्राण आणून बघत होतो व मन:पटलावर कोरून घेत होतो. गाडीने वेग घेतला होता , हवेच्या झुळका वाढल्या होत्या व वातावरणात गारवा निर्माण झाला होता व मी विचारांच्या गर्तेत अगदी खोलवर चाललो होतो, तेवढ्यात एक आजी - आजोबा गाणी म्हणत व भिक मागत डब्यामध्ये फिरतांना दिसले.मनातील आनंदाची जागा अविश्वास,अगतिकता,बेईमानी व लाचारीच्या विचारांनी घेतली . त्या आजी- आजोबांचे म्लान झालेले चेहरे व अंगावरील सुरकुत्या त्यांच्या व त्यांच्यासारख्या शेकडो म्हाता-या लोकांच्या भविष्याची जाणीव  करून देत होत्या.थोड्यावेळापुर्वी बघितलेले वडील व मुलाच्या चेहऱ्यावरील ते हास्य मात्र आता फसवे वाटू लागले . आनंदाची जागा आता अविश्वासाने घेतली होती . कारण याच आजी-आजोबांनी आपल्या बाळाला असेच मांडीवर झोपवले असेल व हाताचा पाळणा करून ,रात्रीचा दिवस करून ते आपल्या मुलांसाठी झिजले असतील ,त्यांच्या सुखासाठी जिवाचे रान केले असेल ,कितीतरी रात्री त्यांनी आपल्या मुलाला भविष्यात कष्ट करावे लागू नये म्हणून स्वत: कष्ट करण्यात घालवल्या असतील .म्हातारपणी मात्र त्यांनाच आपल्या मुलाच्या उबदार मांडीवर डोके ठेवणे तर दुरच पण साधे पोटभर जेवण व घोटभर पाणीही मिळू नये व त्यांच्यावरच भिक मागन्याची पाळी यावी हे बघून मन अगदी सुन्न झाले होते  या जगाची नवीनच व फसवी बाजू नजरेसमोर आली होती.मनाला नविनच प्रश्नांनी छेडायला सुरवात केली होती.हळूहळू गाडीचा वेग कमी झाला होता व स्टेशन आल्यामुळे खाली उतरलो .आता पावसाची जागा बोच-या उन्हाने घेतली होती मनातील बोचणा-या प्रश्नांमुळे कदाचीत सुर्याची किरणे अधिक बोचत आहेत की काय? असे वाटत होते .मनात नविनच प्रश्नांचे गाठोडे तयार झाले होते. व त्या प्रश्नांचा भार मनाला खिन्न करून जात होता .ती प्रश्नांची गर्दीच जणू न पांगण्यासाठीच तयार झाली असावी असे वाटत होते.


                         धिरज चौधरी....

09 Sept 2015.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

पदर

 रणरणत्या उन्हात जणू पावसाची सर तसा मनाला दिलासा तुझा मायेचा पदर आयुष्याची सारी स्वप्न तुझ्यातून जन्म घेती जणू बीजा जोजविते कुशीत ओली माती ठ...