शुक्रवार, 1 अगस्त 2025

फिनिक्स...

 बघ ना...

साऱ्याच शक्यता अशक्यतांचे

दार ठोठावून पाहिले मी,

कुठेच अंत लागताना दिसत नाही

स्वतःच्या अस्तित्वाचा.

नुसताच भेटत आहों,

निराशेच्या अगणित थव्यांना

मनाच्या आत आणि बाहेरही.

तुला कळतंय का...?

उधळून देणार आहे मी स्वतःला

आता याच निराशेच्या गर्तेत मुक्तपणे

मला बघायचीत माझ्याच

उरल्यासुरल्या अस्तित्वाच्या धाग्यांची

छिन्न विच्छिन्न शकले होतांना.

मनावर आलेली दंभाची सूज

फुगून गळू होऊन फुटेस्तोवर

न्याहाळत रहायचीय मला

शून्य नजरेने एकटक.

होऊ द्यायचेत उध्वस्त

मनाच्या तळाशी साठलेले

सारे विकार,

जळू द्यायचीय

हाडांना चिकटून बसलेली

"मी" पणाची चरबी.

राखेत मिळू द्यायचीय

आत्मप्रौढीची अंगभर लटकलेली

लक्तरे.

आणि त्या राखेतून घ्यायचीय

थेट उड्डाण मुक्ततेच्या दिशेने,

खरं सांगू,

मला "फिनिक्स" व्हायचय.

01/08/2025

धिरज चौधरी...


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

पदर

 रणरणत्या उन्हात जणू पावसाची सर तसा मनाला दिलासा तुझा मायेचा पदर आयुष्याची सारी स्वप्न तुझ्यातून जन्म घेती जणू बीजा जोजविते कुशीत ओली माती ठ...