सोमवार, 7 मार्च 2022

मनोगत...

 निळ्या निरभ्र आकाशाखाली,

चांदण्यांच्या सहवासात

बसायचय तुझा हात हातात घेऊन,

सांगायचीय मनाच्या तळातील

सारी गुपिते तुला,

कारण माहित्येय मला,

तू ऐकत बसशील,साऱ्या गोष्टी

कुठल्याही निष्कर्षाशी न पोहचता.


आदिम काळापासूनच,

घेत आली तू मला पोटात

आणि मी,

भोगत आलो तुला, कधी मनाने,

कधी तनाने, कधी विखारी नजरेने

तरी झाकत आलीस माझं कमजोर असणं

कधी आई बनून, कधी बाई बनून,

कधी आजी बनून, कधी ताई बनून.

कधी प्रेयसी बनून,कधी सई बनून,

सामावत राहालीस माझ निर्माल्य स्वतःमध्ये

एखाद्या अथांग नदीप्रमाणे.


खर सांगू, 

आज विचारायचय तुला, कस जमत ग?

इतकं अथांग वाहत राहणं,

कधी कृष्णाची राधा,

इमरोजची अमृता,

रोमिओ ची ज्युलियट,

बनून सतत समर्पित होत राहणं?

कसं जमतं ग स्वतःच अस्तित्व विसरून 

दुसऱ्याच्या अस्तित्वाला पूर्णत्व देणं?



आज सांगायचंय तुला

तू नसतीस तर हा जीव गहिवरला नसता,

नसती कळली समर्पणाची व्याख्या,

तु नसतीस तर, कळलं नसत सौंदर्यालाही

खंबीर पणाची धार असते ते.

खर सांगू,

तू नसतीस तर कळलच नसतं

"माणसात बाईपणाचा अंश आल्याशिवाय 

 माणसाला पूर्णत्व प्राप्त होत नाही ते".


धीरज चौधरी.

07/03/2022


 




2 टिप्‍पणियां:

पदर

 रणरणत्या उन्हात जणू पावसाची सर तसा मनाला दिलासा तुझा मायेचा पदर आयुष्याची सारी स्वप्न तुझ्यातून जन्म घेती जणू बीजा जोजविते कुशीत ओली माती ठ...