तुझ्या आठवांचा मना भास होता,
मनाचे जणू होऊ लागे स्थलांतर,
जसे कस्तुरी शोधत पळावे मृगाने
तसा शोध चाले मनाचा निरंतर.
तुझ्या आठवांचा शिरस्ता निराळा
कधी राजरस्ता हा अल्लडपणाचा,
कधी गोड हास्याचे थवे सोबतीला
कधी भासतो जथ्था हा वेदनांचा.
तुझ्या आठवांची गुपिते निराळी
कधी खोल दुःखाच्या गर्तेत नेते,
कधी लाख मैफली सजवते मनाशी
कधी एकटेपणाचे वरदान देते.
तुझ्या आठवांची कशिदा निराळी
कधी बेरंग रंगांची आरास ही,
कधी अमृताचे माधुर्य तयाला
कधी मरणासन्नतेचा भास ही.
धिरज चौधरी...
19/04/2025