शनिवार, 24 सितंबर 2022

तु आणि आठवण....

 बाहेर वळचनिशी 

पावसाच्या सरींनी लगट करायला सुरुवात

केली की

मनात तुझ्या आठवणींच्या

सरीही बेधुंद होऊन फेर धरू लागतात,

आणि अश्यावेळी 

ठेवनीतली अत्तराची कुपी सांडून

घरभर सुगंध पसरावा तशी,

पसरत जाते तुझी आठवण मनभर...


बुधवार, 7 सितंबर 2022

कविता...

 कधीकधी राहतात काही कविता खदखदत,

आत कुठेतरी जाणिवेच्या तळाशी,

धुमसत राहतात कवीच्या विचार वलयाशी,

जिंदादीलिने गलितगात्र होईपर्यंत.

अमरत्वाच वरदान घेऊन आलेल्या त्या,

कित्येक युद्धे जगतात, 

कवीच्या मनरुपी रणांगणावर. 

हळूहळू प्राप्त करतात विजय

आणि भरतात उड्डाणे, 

राखेतून जन्मनाऱ्या फिनिक्स सारख्या.


काही कविता, घेतात हातात हात कवयीत्रीचा

आणि एका जिवलग मैत्रिणीसारख्या, 

हसत खिदळत पुरवत राहतात तिच्या,

भावनांना पंख आणि मनाला ऊब,

नी पेरत राहतात मुक्त विहाराची स्वप्ने

कवयित्रीच्या मनाच्या कोंदणात.


काही कविता जन्मत घेतात मातीतून

सांगत राहतात कष्ट, स्वतंत्रता

व निरागसतेच्या कहाण्या 

आणि 

भिनत राहतात कष्टकऱ्यांच्या

रक्तात कधी घाम तर कधी

मृद्गंध बनून.


काही कविता, 

तेवत राहतात सैनिकांच्या हृदयात

त्याग,संघर्ष, व पराक्रमाची ज्योत बनून,

पुरवत राहतात त्यांना शौर्याची स्वप्ने व 

सांगत राहतात

हौतात्म्याच्या कहाण्या.


खरं सांगायचं तर,

कविता जन्मत राहते करोडो शरिरांनी, 

कुठल्याही कोपऱ्यात

तिला नसतेच चाड गरिबी, श्रीमंतीची, 

काळया, गोऱ्याची, लंगड्या , लुळ्यांची

ती,

स्वच्छंदता, स्वातंत्र्य, क्रांती, या आभूषणानी

येते नटून, आणि बरसत राहते अखंड जलधारांनी

पर्वतावरून कोसळणाऱ्या जलप्रपातासारखी.


धिरज चौधरी...

07/09/2022

पदर

 रणरणत्या उन्हात जणू पावसाची सर तसा मनाला दिलासा तुझा मायेचा पदर आयुष्याची सारी स्वप्न तुझ्यातून जन्म घेती जणू बीजा जोजविते कुशीत ओली माती ठ...