मंगलवार, 7 दिसंबर 2021

'हो' 'नाही' च्या उंबरठ्यावर" प्रतिक्रिया...

 काही पुस्तकं हाती घेतली आणि वाचायला सुरुवात केली की संपूच नये असे वाटत राहते. तो ज्ञानरूपी अमृताचा झरा अविरत प्रवाही रहावा, कधी आटूच नये व त्यामधील अमृताच्या आस्वादाने मन वेळोवेळी तृप्त होत रहावं अस वाटत राहते. तश्यापैकीच हल्ली वाचनात आलेलं एक अप्रतिम पुस्तक म्हणजे रुपेश देशमुख यांचा गझलसंग्रह.

गझलसंग्रह वाचायला घेताच नजर खिळल्या जाते ती संग्रहाच्या शीर्षकावर, होय खरंय, शीर्षक आहेही तेवढंच अर्थपूर्ण -

'हो' 'नाही' च्या उंबरठ्यावर" 

एक गोड हवीहवीशी रुखरुख लावणारं, आणि कवीची एकोणएक गझलपण तोच गोडकडू,अर्थपूर्ण कातरस्वर आळवत राहते पूर्ण पुस्तकभर संपूर्ण गझलसंग्रह त्याच अगतिकतेने एक वेगळ्या प्रकारची बेचैनी पेरत जातो वाचकाच्या मनामध्ये. बेचैनी विचार करायला लावणारी, बेचैनी एका वेगळ्याच कल्पना विश्वात घेऊन जाणारी,नात्यांवर, मानवी जीवनावर,मानवी अस्तीत्वावर, राजकारण, अर्थकारण इत्यादी विषयांवर विचार करायला लावणारी. 

मात्र हे सगळं लिहत असताना कवी कोणत्याही जड शब्दांचा आधार घेत नाही किंवा कोणतीही संदिग्ध प्रमाणे देऊन गझलेला कठीण करत नाही हे मात्र विशेष. साध्या शब्दांमध्येही इतकं मोठं तत्वज्ञान मावू शकते याचा उत्तम नमुना म्हणजे कवीची गझल असं मला वाटते.संग्रहाच्या सुरुवातीलाच प्रातिनिधिक गझलेमध्येच याचा प्रत्यय येतो.


प्रतिनिधिक गझलेमध्येच कवी प्रेमासारख्या हळव्या विषयाला हात घालतो आणि लिहितो,


"कधी संयमी कधी अनावर, आपण दोघे

हो - नाही च्या उंबरठ्यावर आपण दोघे"


कोणत्याही जड शब्दांचा वापर न करता अगदी प्रवाही शब्दांमध्ये लिहिलेल्या या ओळी सुरुवातीलाच मनाचा ठाव घेतात आणि वाचक हळूहळू गुंतत जातो व मग सुरू होतो एक आगळावेगळा शब्दप्रवास एका अवीट अनुभूतीकडे घेऊन जाणारा. हा प्रवास घेऊन जातो वाचकाला त्याच्याच मनाच्या गाभाऱ्यात एकुनएक हळव्या कोपऱ्याला स्पर्श करायला.मनाच्या हळव्या कोपऱ्यांना स्पर्श करतानाच कुठेतरी वाचकाच्या मनातील कित्येक सलींना सुध्दा कवी तितक्याच खुबीने हात घालतो हेही मात्र विशेष. जेव्हा कवी म्हणतो,


हवे नकोसे किती बहाणे करीत आली

फिरून माझी उन्हे तुझ्या सावलीत आली...........................................................................................................................................

कुठे तुला भेटणार भाऊ विशुद्ध सारे?

अता हवाही सभोवती संकरित आली.


वरील ओळी वरवर पाहता साध्या वाटत असल्या तरी गझलकार मात्र एका शाश्वत सत्यावर अचूकपणे बोट ठेवण्याचा प्रयत्न करतोय असे दिसते. या चंगळवादी जगामध्ये वाढत असणारा दुटप्पीपणा आणि निर्मळ व सरळ स्वभावी माणसाची भासत असलेली चणचण यावर कुठेतरी आपल्या विशेष शैलीत भाष्य करण्याचा प्रयत्न गझलकार करतो आहे हे प्रत्ययास येते.

अश्या एक ना अनेक ओळी कवीनी मानवी मनातील अगतिकता मांडण्यासाठी वापरलेल्या संपूर्ण गझलसंग्रहामध्ये दिसतात. आणि अश्या अर्थपूर्ण ओळी वाचल्यावर कवीची गझल वरवर भाष्य न करता मानवी मनाच्या विविध पापुद्र्याना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतेय असे लक्षात येते.

पुढील ओळींमध्ये तर कविनी शब्दांनद्द्वारे चितारलेली विलक्षण व अर्थपूर्ण प्रतीमा मनाला विशेष भावून गेली


तेवढे काहीच नव्हते त्यामध्ये

जेवढा तू ताणला मुद्दा तुझा

स्पर्श केला फक्त मी अलवारसा

बघ किती गंधाळला गजरा तुझा.


वरील चितारलेली प्रतिमा, "गजऱ्याचे गंधाळणे" हे सारे शब्द प्रयोग व साधलेला टायमिंग या सगळ्या गोष्टी विशेष पणे व खूप विचार मंथन झाल्यावर आलेल्या दिसतात हेही खरे.

मानवी मनाच्या विविध पैलूंना हात घालण्याबरोबरच बाहेरील जगात चाललेले राजकारण,गोरगरिबांची पिळवणूक, पुंजिवादी अर्थकारण ईत्यादी  गोष्टींना सुध्दा कवी मुळीच नजर- अंदाज करीत नाही.

पुढील ओळींद्वारे या जगाची एक अत्यंत निर्दय व पूर्ण मानवजातीला विचार करायला लावणारी बाजू कवी अलगदपणे व तितक्याच प्रभावीपणे वाचकांसमोर ठेवतो.


दप्तरात पुस्तके असावी 

यात कुणी पिस्तूल ठेविले?


जगात चाललेले राजकारण त्याकडे पाहण्याचा कवीचा दृष्टिकोन व सामान्य माणसाची होत असणारी पिळवणूक व त्यामुळे सामान्य माणसाच्या मनातील होणारी घालमेल कवी कुठेतरी समोरील ओळींमध्ये शब्दबध्द करून वाचकाच्या समोर आणण्यामध्ये यशस्वी झालाय हे पुढील ओळींद्वारे दिसून येते.


मी नांगरून आलो माझी तुझी कहाणी

उगवेल जे हवे ते येथे खुशाल आता

येणार सांग केव्हा घामास गंध अमुच्या?

हा तृप्त ढेकरांचा आहे सवाल आता.

त्रागा करून उठल्या भिडल्यात अंबराला

या झोपड्या निनावी झाल्या मशाल आता


वर्तमान परिस्थितीवर भाष्य करीत असताना कवी कोणत्याही गोष्टीची कसर सोडत नाही हे मात्र अगदी सत्य. महान हुतात्म्यांच्या विचारांना ढाल बनवून सत्ता बळकावणे व पुढील वर्षानुवर्षे त्या सत्तेवर मजा मारणे अश्या मनोवृत्तीला सरसावलेल्या राजकारण्याचे सगळीकडे पेव फुटलेले जिकडे-तिकडे दिसून येते. अश्या परिस्थितीवर कवी अगदी अचूकपणे निशाणा साधण्याचा प्रयत्न पुढील ओळींच्या माध्यमातून करताना दिसून येते.


शोधून सापडेना साधे निशाण माझे 

बेवारश्याप्रमाने हे वर्तमान माझे

पुतळे उभारले अन् केल्यात फक्त चर्चा

यांनी विचार कोठे केले महान माझे. 


फक्त पुतळे उभारून शहरांचे मेकअप करायचे मात्र महान लोकांच्या विचारांना अंगीकारणे तर दूरच पण त्यांच्या महान विचारांचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करून स्वतःच्या वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन करायचे व त्यांच्या अस्तित्वालाच काळीमा फासायचा ही वृत्ती समाजाचे अधःपतन होण्यासाठी सर्वस्वी जबाबदार आहे. 


गरिबांनी गरीबच राहावे व श्रीमंतांनी पुन्हा पुन्हा मोठमोठाली महाले गरिबांच्या जीवावर उभारून संपत्तीचा माज करावा ही वृत्ती तर अनादिकालापासून या विश्वात चालत आलेली आहे. वेळोवेळी या वृत्तीवर बोलल्या गेले लिहिल्या गेले, अनेक आंदोलने सुद्धा झाली पण बदल तो मात्र कोणत्याही काळात दिसून आलेला नाही ती जखम बरी होण्याऐवजी पुन्हा चिघळतच राहिली. शेतकरी, कामगार, मजुरवर्ग इत्यादींना राजा न मानता, धनपिपासू व रक्तपिपासू वृत्तीच्या लोकांना राजा मानून त्यांची पूजा होणे त्यांना मान मिळणे ही मात्र खूप मोठी शोकांतिका आहे.जो खरा राजा आहे त्याला मात्र पायाच्या धुळीप्रमाने लेखल्या जाते व जो बांडगुळ बनून स्वतःचे पोट भरतो त्याच्या डोक्यावर मात्र मुकुट घालून मिरविल्या जाते. हीच सल कदाचित पुढील ओळींच्या माध्यमातून कवीला मांडायची असेल असे प्रकर्षाने जाणवते.


चेहरा इतका तुझा का रापला?

तू उन्हे कोळून प्याला वाटते?

वाहती वारे नपुंसक का असे?

हा ऋतू षंढत्व व्याला वाटते? 


सुलतानी संकटांनबरोबरच अस्मानी संकटांनी बेजार झालेला शेतकरी व त्याला घ्यावे लागणारे काबाडकष्ट यावर भाष्य करणारा हा शेर तर मनाला सुन्न करून जातो.


हे सर्व विषय हाताळताना गझलकार मात्र गझलेचा गाव विसरत नाही गझलेचा अर्थ, उद्देश, व्याप्ती, व मर्यादा या सगळ्यांशी गझलकाराची प्रामाणिकता टिकून राहते. कुठेही अवास्तवतेचा लवलेशही गझलेला स्पर्श करून जात नाही हे मात्र सत्य.

एका अश्याच ओघवत्या कवितेत कवी कवितेची खूप मार्मिक व अप्रतिम व्याख्या करून जातो. कविता म्हणजे काय, कवितेचा प्रांत कोणता, या आणि अश्या अनेक गोष्टींची कल्पना या कवितेतून वाचकास आल्यावाचून राहत नाही


गूढ मनातील वादळ म्हणजे कविता असते

अव्यक्ताची कळकळ म्हणजे कविता असते 

ती डोळ्यांनी शब्दामधली फुले वेचते

मौनामधला दरवळ म्हणजे कविता असते 

कुठे बोलतो सगळ काही मोकळेपणे?

तुझ्याआतली हळहळ म्हणजे कविता असते

मध्यरात्रीला रस्तासूद्धा हितगुज करतो

शांततेतली वर्दळ म्हणजे कविता असते.


गझलसंग्रह या व अश्याच अप्रतिम गझलेनी भरलेलं भंडार आहे. कितीतरी कविता एकदा वाचल्यावर आपोआप व अनपेक्षीतपणे ओठावर तरंगायला सुरुवात होते व वाचक गुणगुणायला सुरुवात करतो इतकी सहजता , लयबद्धता व ओघवतेपणा कवीनी प्रत्येक कवितेत ओतलाय हे मात्र खरच आशर्यकारक व अभीनंदनिय आहे.


धिरज चौधरी...



























पदर

 रणरणत्या उन्हात जणू पावसाची सर तसा मनाला दिलासा तुझा मायेचा पदर आयुष्याची सारी स्वप्न तुझ्यातून जन्म घेती जणू बीजा जोजविते कुशीत ओली माती ठ...